<-- home

व्हॅलेण्टाइन डे आणि मी

‘तो’ आणि ‘ती’

‘तो’ म्हणजे व्हॅलेन्टाइन डे आणि ‘ती’ म्हणजे अस्वस्थता (त्या दिवशी उगाचंच वाटणारी…)

तर ते असं… की, या खास दिवसाचं आकर्षण तसं नवीन नाहीये. नववी – दहावीत आल्यापासून म्हणजे ‘कळायला‘ लागल्यापासून या दिवशी एक अनाहूत हुरहूर लागून रहायची. एखादी मस्त मैत्रीण असावी अशी पूर्वापार चालत आलेली इच्छा. मस्तची व्याख्या मात्रं कालानुरूप बदलत गेली किंवा अपडेट होत गेली म्हणा. पण तो भाग वेगळा…

अकरावीत होतो. तारुण्याचे धुमारे फुटलेले. हेच ते वय – पूर्ण खात्री होती. अस्वस्थताही अगदी तशीच. बंधनातून सुटलेली मने इथे खरा रंग दाखवायला सुरु करतात. काही भडक, काही मोहक, काही गडद, काही फिके तर काहींचा रंगच उमजत नाही… त्यातच माणूस बदलला की त्याची आवडही वेगळी. नजरेनेच काही सॅम्पल्स आपण सिलेक्ट केलेले असतात. “माझ्याकडेच तर पाहत नाहीत नं…?” केवढा तो आटापिटा!

मला आठवतंय, त्या दिवशी फिज़िक्सचं प्रॅक्टिकल होतं. भल्या पहाटे राक्षसी वेळेत म्हणजे सक्का-सक्काळी साडेसात वाजता ते सुरु व्हायचं. आठच्या आधी कधी न गेलेला मी त्या दिवशी सव्वासातलाच सायकल स्टॅंड मध्ये हजर! लक्षात आलं की, अजून लॅबपण उघडलेली नाहीये. भारताची प्रगती खुंटण्यामागचं खरं कारण कोणतं? असं विचारलं असता, आपला वेळेबाबतचा निष्काळजीपणा असंच उत्तर दिलं असतं मी कदाचित. यथावकाश डुलत-डुलत येऊन शिपाई काकांनी लॅब उघडली. आज पहिल्यांदाच मी लॅबमध्ये एकटा होतो… एकटाच… नाही! मी एकटा नव्हतो… माझ्यासोबत होती ती… तीच अस्वस्थता…

याच अस्वस्थतेला घेऊन प्रॅक्टिकल केलं. नक्की काय केलं? आठवत नाही… (कधी नव्हे ती) सगळी लेक्चर्स अटेंड केली. काय शिकलो? आठवत नाही… प्रॅक्टिकल झालं, कॉलेजमधली लेक्चर्स झाली, क्लासही झाला शेवटी घरी आलो. त्या दिवसात काय झालं? नीट आठवत नाही… काय केलं? तेही धड लक्षात नाही! मग या अस्वस्थतेला घेऊन तसाच झोपी गेलो. माझा पहिला रंगीत व्हॅलेन्टाइन डे संपला होता. त्या दिवशी विशेष असं काहीही झालं नाही.

पुढच्या वर्षी बारावीत तो पुन्हा आला. पण काय करणार? प्रिलिम्समध्ये पाडलेल्या उजेडाचा चांगलाच समाचार घेतला गेला होता. तेंव्हा अस्वस्थतेला गुंडाळून एका कोपऱ्यात ढकलून दिलं. माझं हे देखील वर्ष व्यर्थ गेलं…

आणि अहो आश्चर्यं! ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात तो पुन्हा तीला संगे घेउनी आला. पण हाय राम… साला, माझं नशीबच फुटकं… च्यामारी, #$%!&#@$(%#&^$#… एव्हढंच नाही, तर – या समस्त मुलींच्या जातीचं कसं होणार? असाही एक प्रश्न चमकून गेला.

तो येतंच राहिला, ती ही सोबत करत होती. पण आता तिची येण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. ती आता केंव्हाही येत असे. सबमिशन्स, प्रोजेक्ट्स, कंबर्ड्यात बसलेली केटी, इतकंच नाही तर वर्तमानपत्रातल्या बातम्या, मित्राने फेकलेले थोटूक, रस्त्यावर पडणारे रॅपर्स आणि अगदी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी देखील अस्वस्थ करून जात असत.

याच दिवसांत पालकांविषयीचा आदरभाव दुणावला. का? कोण जाणे? बहिणीला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटू लागले. का? कोण जाणे? येता-जाता आणि घरात देखील जमण्यासारखी कामं करू लागलो. का? कोण जाणे? वागणुकीत पडलेल्या फरकामुळे बाबांनी माझी चौकशी केली (:D:D:D) का? कोण जाणे…?

मला इतकंच कळत होतं की, मी मलाच आवडू लागलो होतो. स्वभावातला भाम्बावालेपणा जाऊन नेमकेपण येऊ लागला. तशातच बायोटेक घेऊन चूक तर केली नाही ना? अशी शंका आली आणि काही महिन्यांतच त्यावर शिक्कामोर्तब झाले. ही तीन वर्ष मग कशीबशी ढकलली. घरच्यांची संमती घेत (किंवा… त्यांची समजूत काढत) एण्ट्रन्सचा बागुलबुवा पार करून धाडकन MCA त उडी घेतली. जगायला आता खरी मजा येऊ लागली. ग्रॅज्युएशनला कधी न मिळालेले डिस्टिंक्षन पहिल्याच वर्षी दणक्यात मिळवले. अजून चांगल्या कॉलेजमध्ये डोनेशन न भरता प्रवेश घेणे त्यामुळे सोपे गेले.

नेमेची येणारा तो येतंच होता, ती ही सोबत करत होती. एव्हाना याची सवयच होऊन गेली. या दोघांची डायरेक्ट रिलेशनशिप नाहीये आणि म्यूचुयल डिपेंडेन्सी तर नाहीच नाहीये… साक्षात्कार झाला! दुसऱ्यावर करण्याआधी प्रेम स्वतःवर केलं पाहिजे… माझी ट्यूब पेटली! पडताळल्याशिवाय अवलंब करू नये. टेस्टिंग करण्याआधीच गो-लाईव्ह… अहो, शक्य आहे का हे?

पोस्ट ग्रॅज्युएशनची ही तीन वर्ष सुसाट गेली. स्वतःवर प्रेम करावं… आता शिकलो. महत्वाचं म्हणजे ‘का? कोण जाणे?’ ला उत्तर सापडलं – मी या ट्रान्झिशन पिरीयडमध्ये होतो. स्वतःवरच प्रश्न तयार होतात, त्याची उत्तरेही स्वतःलाच सापडतात. हे एक बरं असतं. पण मधला कालावधी मात्रं जीवघेणा असतो. कॅंपसमध्ये सिलेक्शन झालं. एका MNC त नोकरीला लागलो. सहाच महिन्यांत बढती आणि पगारवाढ देखील झाली. पण, एक गोष्ट खटकते आहे…

कारण, आज तो आला पण ती नाही आली. का, कोण जाणे?