<-- home

प्रगती

दोनच दिवसांपूर्वी सुहास झेलेने एका पोस्ट वरती कमेंट दिली. ती अशी, “आज तुझा हा लेख ई-मेल ने आला होता. दुसर्‍या एका ब्लॉगवर प्रकाशित झालाय हा, काळजी घे. हा घे दुवा-” पुढे लिंक ही दिली होती. लिंक वर क्लिक करून मी त्या ब्लॉगवर गेलो आणि माझीच पोस्ट बघितल्यावर असा काही चिडलो.. की बस्स! डोकंच सटकलं! (ह्या तीन महिन्यांत माझा ब्लॉग, माझ्या पोस्ट्स, त्यांना मिळणारे हिट्स हे सारं डोक्यात घुमतंय. नव्याचे नऊ दिवस!) तेंव्हा पहिल्यांदा सुहासला धन्यवाद दिले आणि फेसबुक, ट्विटर, गुगल बझ  वर त्या ब्लॉगचा चांगलाच बोऱ्या वाजवला… डोकं थोडं थंड झाल्यावर मग त्या ब्लॉग-कर्त्याचा शोध घेऊ लागलो. कुठेही त्याचा ई-मेल आयडी  नव्हता. आता काय करणार? शेवटी चरफडतंच त्या पोस्टला “छान जमलाय लेख! फक्तं पुढच्या वेळी तो स्वतःचाच असेल याची काळजी घ्या… ” हाणलं एन्टर.

तुझी Ctrl+C, Ctrl+V ची हुशारी तुला लखलाभ, माझी हुशारी मला. ती तर नाही ना कोणी चोरू शकत… हो ना, आणि इतके प्रतिभाशाली लेखक, कवी, साहित्यकार होऊन गेलेत, तेंव्हा मज पामरासी काय थोरपण? त्या थोर पुरुषांना देखील ह्या असल्या भुंग्यांनी त्रास दिला, त्यात मी म्हणजे कीस झाड की पत्ती? (बापरे… आता bhunga.blogspot वरून देखील डंख बसतील) माझा चेहरा पाहून की काय, बॉस वाट वाकडी करून माझ्याकडे आला. विचारलं. सांगितलं. तो हसला, आणि जाता जाता एक सूचक वाक्य टाकून गेला. म्हणाला, “मित्रा, जेंव्हा कोणी तुझी कॉपी करू लागेल, तुझा कोणी तिरस्कार करू लागेल तेंव्हा एक गोष्ट लक्षात घे : तुझी प्रगती होत आहे!” गडी खूश! (कारण स्व सुखावला) प्रगती…

Everyone is the media now. एकविसाव्या शतकात फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स ही आयुधं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. त्या मागच्या ग्लॅमर वरच काही जण भाळतात. त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारीचं भान तर सोडाच पण ही आयुधं परिणामकारकरीत्या कशी वापरावीत याचंही तारतम्य त्यांच्याकडे अभावानेच आढळतं.