<-- home

हर हर महादेव

हे पुस्तक बाजारात येऊन तसा बराच अवधी झालाय. मित्राने आग्रह केला म्हणून गेल्याच महिन्यात वाचायला घेतलं. तेंव्हा असं कळलं की दुसरा भाग देखील प्रकाशित झाला आहे. लगोलग तोही वाचून मोकळा झालो. Shiva trilogy मधील दोन पुस्तकं आत्तापर्यंत लिहिली गेली आहेत. The Immortals of Meluha आणि The Secret Of The Nagas. तिसरं पुस्तक The Oath Of The Vayuputras या वर्षाच्या शेवटी येईल अशी अपेक्षा आहे.

The Immortals of Meluha आमिष त्रिपाठीचं पहिलंच पुस्तक ऑगस्ट 2011 मध्ये प्रकाशित झालं.लेखकाने हिंदू देव-देवतांना पृथ्वीवर खेचून आणलंय आणि देवपण काढून त्यांना माणसांच्या अवतारात, कर्मात बांधलंय. परिस्थिती, अडचणी, त्यांना तोंड देताना चुकलेले निर्णय, त्याचे परिणाम, भावनिक आंदोलने, थोडक्यात - सामान्य माणसाच्या जीवन रगाड्यात अगदी घुसळून टाकलं आहे.

The story of Shiva. The simple man whose Karma recast him as our Mahadev. The God of the Gods.

meluha

शिवा. कैलास पर्वताच्या पायथ्याशी मान सरोवराच्या किनारी राहणाऱ्या एका जमातीचा म्होरक्या. अंगभूत आणि कमावलेल्या कौशल्यावर त्याच्या टोळीचे नेतृत्व करत असतो. त्यांचं संरक्षण करत असतो. राजा दक्ष, मेलुहाचा सम्राट याच्या बोलावण्यानुसार शिवा आधुनिक, प्रगत अशा सूर्यवंशी साम्राज्यात येतो आणि इथे कथा वेग घेते. पण मला कथा सांगायची नाहीये. थोडं विश्लेषण करायचंय.

सप्तसिंधू, तिथला प्रदेश, संस्कृती (Indus Valley Civilization), गंगा संस्कृती आणि ब्रह्मपुत्रा नदी तिला मिळाल्यानंतर तयार झालेला सुपीक नंदनवनाचा पट्टा. इथेच कथा घडत असल्याने ती फार आपलीशी वाटते. हडप्पा, ब्रंग प्रदेश, मैका, दंडकारण्य असे संदर्भ; त्यात शिवा, नंदी, सती(पार्वती) यांना घुसडून एक अजब रसायन तयार झालंय आणि हे सगळं जरी काल्पनिक असलं तरी सयुक्तिक आहे आणि म्हणूनच ही कथा भावते.

देव-देवतांना घेऊन, त्याच्या अस्तित्वावर (म्हणजे त्यांचं असणं-दिसणं इथपासून) असं भाष्य करणं, त्यांना काल्पनिक कथेत गुंफणं हे पहिल्यांदाच घडतंय (माझ्या माहितीनुसार). नॉर्वेजीयन, ग्रीक मायथॉलोजी मध्ये हे विषय हाताळले गेले आहेत. अगदी त्यांच्यावर सिनेमा निघाले आहेत. तिथल्या जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. पण हा विषय या पातळीवर हाताळण्याचं धाडस आणि कसब, तेही एका भारतीय लेखकाकडून पहिल्यांदाच पहातो आहे.

या झाल्या जमेच्या बाजू.

लिखाणाच्या बाबतीत मात्रं लेखकाने सपाटून मार खाल्ला आहे. कल्पना उत्तम असली तरी लेखणीत दम नसेल तर कसा बोऱ्या वाजू शकतो याचं हे एक उदाहरण. संवादात देखील गोंधळ उडालेला दिसतो. ई.स.पू. 1900 च्या आसपास घडलेली गोष्ट आणि त्यामानानेने संवादाची भाषा फारच आधुनिक वाटते. त्याचा फटका वातावरण निर्मितीला बसला आहे. काही ठिकाणी भाषा बालिश वाटते. एखादा घन-गंभीर विषय शाळेतला मुलगा उड्या मारत सांगतोय असं वाटतं. तसेच काही शब्दप्रयोग आणि वर्णनं परत परत येतात. पण त्याचा कंटाळा जरी आला तरी पुस्तकाचा कन्सेप्ट म्हणजे - आबा तोबा साईबाबा! आणि त्यामुळेच हे पुस्तक खाली ठेवलं जात नाही. बिझिनेस वर्ल्डने आमिषला ‘Paulo Coelho of the East’ असं म्हणलंय. पण ते पटत नाही. कारण reading between the lines हा प्रकारच अस्तित्वात नाही. या पुस्तकाचं पोटेन्शिअल इतकं असताना एडिटर्स झोपले होते का? आणि जर झोपले नसले तर त्यांनी काय काम केलं? असा प्रश्न पडतो.

प्रोब्लेम असा होतो - एकतर ही कथा प्रचंड आवडते आणि त्यामुळे ह्या गोष्टी खटकतात. अगदी अक्षम्य चुका वाटतात. सूर्यवंशी, चंद्रवंशी, त्यांचं साम्राज्य, त्यांच्या समाजरचना, वेगळे मत प्रवाह, त्यांना असणारे मनु, रुद्र, राम यांचे संदर्भ, त्यांना त्रास(?) देणारे नागा लोक, त्यांचा विचित्रपणा, मग त्यांची संस्कृती यामध्ये वाचक गुरफटून जातो. सुरुवातीच्या अर्ध्या भागात पात्रांची, समाजाची ओळख होते आणि नंतर खरी मजा सुरु होते. शिवाचा नीलकंठ ते महादेव पर्यंतचा प्रवास, त्याला मदत करणारे वासुदेव, मग छुपे हल्ले, द्वेष, त्याची परिणीती युद्धात मग त्याचे परिणाम हे सारे कळून घेत असतो नसतो तोच पुस्तक संपतं.
हर एक है महादेव! हर हर महादेव!

secret_of_the_nagas

The Secret Of The Nagas हातात पडेपर्यंत मात्रं फार त्रास होतो. कधी एकदा वाचतोय असं होऊन जातं. पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग वेगवान आहे आणि यात सलगता जाणवते. तसंच, वर सांगितलेल्या सर्व उणीवा (जवळ जवळ) पूर्णपणे भरून काढल्या आहेत. लेखकाने बरीच मेहेनत घेतल्याचं लक्षात येतं. त्याची स्वतःची विकसित झालेली शैली दिसून येते. या भागात पात्रांची संख्या दुपटीने वाढते पण लेखकाने त्यांची भट्टी मस्त जमवली आहे.

या भागात नागा संस्कृतीची जवळून ओळख होते. दंडकारण्य, नर्मदा, गोदावरी यांचे सुरेख संदर्भ आहेत. यातील परशुरामाची गोष्ट वाचनीय. काली आणि गणपती यांच्यावर जे तर्कसंगत भाष्य आहे, खरंच, अगदी थक्क करणारं आहे. पुराणातल्या वांग्यांचं फक्कड भरीत बनवलं आहे.

माझा नास्तिक मित्र कायम वाद घालत असतो की, महादेवाची तक्रार PETA कडे करायला हवी म्हणून. मुलाला वाचवण्यासाठी हत्तीला का मारलं, हा त्याचा सवाल. अर्थात, या प्रश्नाला रोखठोक उत्तर या पुस्तकातून मिळत नाही आणि तशी अपेक्षाही नाही; पण एक चपखल आणि तर्कसुसंगत विचार मिळतो.

लेखक मग याही पुढे जाऊन सध्याच्या युगाला कारणीभूत असलेल्या मुख्य वादाला तोंड फोडतो. सत्य - असत्य, सज्जन - दुर्जन, भेदाभेद, जसा दृष्टीकोन बदलेल तसे आपणसुद्धा 180 च्या कोनात बाजू पलटतो. हे अनुभवण्यात खरी मजा येते आणि इथेच लेखक जिंकतो.

Evolve होत असलेला लेखक आणि रोमांचकारी वळणावर येऊन ठेपलेली कथा यामुळे The Oath Of The Vayuputras या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय…

फिक्शनच्या कल्पनेत रमण्यापेक्षा मला आत्मचरित्रे आणि self help ची पुस्तके जास्त जवळची वाटतात. पण ही पुस्तकं वेगळी आहेत. तेंव्हा विचारांना खाद्य हवे असल्यास किंवा हिंदू मायथॉलोजीवर प्रेम असल्यास एकच संदेश - वाचा!