<-- home

खाज

कॉलेजच्या बाहेरच कट्ट्यावर बसलो होतो.

वेळ दुपारी १२.३० – १ ची, महिना ऑगस्टचा.

सिंहगड कॉलेजला बायोटेक च्या दुसऱ्या वर्षात शिकणारे आम्ही - अभिजीत, राहुल (कुल्ल्या), सोहम, दोन चेतन – एक जैनांचा (जैन्या), दुसरा हडपांचा (मामा), दोन भूषण – एक खेडकरांचा (खेड्या), दुसरा वाघुळद्यांचा (वाघ्या) आणि मी.

हलकी सर नुकतीच पडून गेली होती. वारा बोचरा होता. आभाळ कोंदलेलं होतं. सिंहगडमधून थेट दिसणारा सिंहगड त्या दिवशी मात्रं दिसत नव्हता. “…झक्कास! ठरलं तर मग!!”

आणि सिंहगडावर जाण्याचा बेत पक्का झाला.

कॉलेज बंक करायचं ठरलं. सोहम, मामा आणि मी आमच्याकडे डबे होते.

एकूण आठजण, तीन डबे, चार गाड्या आणि समोर (न दिसणारा) सिंहगड. गाडीला किक मारली आणि कधी खडकवासल्याला पोहोचलो ते कळलंच नाही. तिथे थांबण्याचा बेत रद्द केला कारण उशीरही झाला असता, त्यात या दिवसात अंधार लवकर पडतो आणि घरी वेळेत गेलो असतो तर आमची ही छोटीशी ट्रीप बिनबोभाट पार पडली असती (म्हणजे ऑफीशिअली दुसऱ्या ट्रीपला जाता येतं). कधी नव्हे तो वाघ्याने कॅमेरा आणला होता. स्वतःचे फोटो काढून घ्यायची पोराला फार हौस. “येताना काढू…” असा अभी ने बोलबच्चन टाकला, त्यानेही परिस्थितीचा थोडा अंदाज घेतला, कोणीही राजी नाही म्हंटल्यावर सरळ सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन थडकलो. चार प्लेट पोहे आणि एक-एक कटिंग पोटात गेल्यावर ‘वीर मराठे आठ’ गड सर करण्यास सज्ज झाले. कॉलेजमध्ये आल्यापासून आणि त्याआधीदेखील इतक्यावेळा गडावर फिरलो आहे की अपरिचित असं एकही ठिकाण गडावर उरलं नाहीये. गड चढायचा रस्ता तर अगदी तोंडपाठ. हसत-खेळत, किस्से सांगत किल्ला चढत होतो. साधारण मध्यात पोहोचलो असू की गडी दमले. बसलो. पाणी प्यालो. गडाचा वरचा भाग पूर्णपणे ढगात होता. पाऊस रिमझिम होता. वातावरण उत्साही होतं. तेवढ्यात खालून गलका ऐकू आला. तीन-चार जण ओरडत-किंचाळत वर येत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं की हे असुर सुरापान करून आले आहेत. त्यांच्यातील एक तर बेभान झाला होता. दोघंजण त्याला आवरत होते आणि चौथा Nirvana State University मध्ये पोहोचला होता. वय साधारण आमच्या इतकंच असावं. अगदीच मागे-पुढे १-२ वर्षं. तो बेभान झालेला मुलगा काही आम आदमी नव्हता. त्याला अचानक साक्षात्कार झाला, “साला, या रस्त्याने कोणी पण गडावर जातो मग आपण विशेष ते काय केलं? तेंव्हा वेगळी आणि अवघड वाट निवडायला हवी.” त्याने त्याच्या टोळक्याला मंत्रच दिला ‘बिकट वाट वहिवाट असावी| धोपट मार्गा भाळू नको||’ (अनंताशी त्याचं काही वाकडं असावं). म्हणाला, “आज आम्ही (म्हणजे तो स्वतः) धबधब्यातून मार्ग काढत गडावर जाणार. तुम्ही आमच्या बरोबर या नाहीतर येऊ नका. आम्ही निघालो…” आणि खरंच तो उजव्या हाताला एक पायवाट जाते त्याने पुढे गेला. मागचे तिघेही त्याच्या मागे धावले. ‘प्यायल्यावर माणूस वाघ होतो’ ह्या कधीकाळी ऐकलेल्या वाक्याचा अर्थ मला कळाला. वर दिलेल्या हिशेबामध्ये (म्हणजे एकूण आठजण, तीन डबे, चार गाड्या वगैरे) आमच्यातला एक अस्सल गुण सांगितला नाहीए, आणि तो म्हणजे – खाज! “जर अशी पोरं धबधब्यातून जाऊ शकतात तर मग आपण का नाही…?” आता आम्ही देखील वाघ झालो! (तेही न पिताच!) बिकट वाट अनुसरायाची हीच ती वेळ होती! फंदींच्या फटक्याला फाटका ठरवून मग आमच्या टोळीने देखील मुख्य रस्ता सोडला. त्या दुसऱ्या वाटेनं पुढे निघालो. असुर गँग तोपर्यंत दिसेनाशी झाली होती. तसेच आडवे जात-जात बरेच अंतर गेलो. धबधबे दिसत होते पण त्यात घुसण्याचं धाडस होत नव्हतं आणि वर जाणारी एखादी पायवाट देखील मिळत नव्हती. तेंव्हा रस्ता वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ मधूनंच घुसायचं ठरवलं… आणि घुसलो. चढायला सुरुवात केल्यावर मात्र अडचणी समजून यायला लागल्या. त्या वर्षी पावसाळा अगदी १ जून पासून सुरु झाला होता. माती चांगलीच भुसभुशीत झाली होती. काही ठिकाणी पाय घोट्यापर्यंत रुतत होता. चढ अंगावर येणारा होता. ग्रिप वगैरे गोष्ट तर सोडाच पण एका जागी पाय बिलकुल ठरत नव्हता. दम लागला म्हणून कोणी थांबला की लागलाच तो खाली घसरायला. कधी कधी तर पाय उचलला की बूट चिखलातच रुतून बसलेला असायचा आणि परत पाय बुटात घालेपर्यंत वरचा पाय निसटायचा. शोधून मोकळी जागा पाहून चढायला सुरुवात केल्यामुळे पकडायला (आधाराला) काहीच मिळत नव्हतं. गवत धरायला गेलो तर तेच हातात येत होतं. घसरत, आपटत, एकमेकांना आधार देत तसेच वर चढत होतो. एव्हाना ढगांनी आम्हाला घेरून टाकलं. १० फुटांपलीकडे काही दिसायला तयार नाही. पावसाचा जोर वाढला. आणि समोर दाट झुडपांचा एक पट्टा आला. त्या पट्ट्याची लांबी-रुंदी कळत नव्हती मग आम्ही देखील त्याला शिंगांवर घेण्याचं ठरवलं. सरळ आत घुसलो. इथे सोहम पुढे झाला. नेमकी झुडपांची उंची देखील आमच्याएवढीच होती, त्यामुळे रांगतच जावं लागत होतं. पुढच्याच्या हातातून, खांद्यातून सुटणाऱ्या फांद्यांच्या थपडा बसत होत्या, बूट फांद्या-मुळांत अडकत होते, जमीन निसरडीच होती. इथे आधाराला बरंच काही होतं पण झुडपं दाट असल्याकारणाने साप, विंचूची भीती होती. थोडं-थोडं अंतर ठेवत रांगत का होईना पण चढाई सुरु ठेवली होती. आणि जशी आली तशीच, अचानक झुडपं नाहीशी झाली! उल्हसित झालो. रस्ता नसताना केलेल्या चढाईचे कौतुक वाटले. हात-पाय बरबटले होते. झुडपांनी प्रेमळपणे शर्टावर हिरव्या रंगाची उधळण केली होती. पण याचं काहीच वाटत नव्हतं. कारण अजून आमची खाज जिरली नव्हती. स्वप्नातदेखील इतक्या जवळून कधी निसर्ग पहिला नव्हता. श्रम खूप झाले होते. सगळेच दमलो होतो. पाऊस तर अक्षरशः कोसळू लागला होता. तसेच थोडावेळ बसून राहिलो. आजुबाजूला फक्त डोक्याएवढे गवत आणि झाडी. दम खाउन पुन्हा नव्या जोमाने चढाई सुरु केली. घसरत होतो, पडत होतो, दमलो होतो, पण अजून हरलो नव्हतो. ढग देखील आता दाट झाले. हायवे वरून जाताना अगदी गाडी थांबवून ढगात गेलेल्या डोंगरांचे फोटो घेणारे आम्ही… याच ढगांनी आम्हाला आज अधू केले होते. आपण किती वर आलो आहोत? आणि अजून किती जायचं आहे? याचा काहीच अंदाज येत नव्हता. या अस्मानी (शब्दशः अर्थ घ्या) संकटांना तोंड देत असतानाच ढग थोडेसे विरळ झाले आणि दूरदर्शनचा टॉवर दिसला! “व्वा! संपलाच ना गड…”

“टॉवर दिसला, म्हणजे आलाच की गड आता!” तेंव्हा आम्हाला आधीच लक्षात आलेला एक प्रोब्लेम खरंच दत्त म्हणून उभा राहिला… कडा! गड आणि आमच्यामध्ये आता फक्त कडा होता. पण हा कडा कसा पार करणार? कड्याला येऊन भिडलो. टॉवरच्या अगदी सरळ रेषेत खाली होतो. खेड्या पुढे सरसावला. आता खड्या कड्यावर चढणार खेड्या! महत्प्रयास करून एक पुरुषभर उंचीवर पोहोचला खरा, पण त्याला पुढे चढता येईना. पडत, धडपडत इथवर आल्यावर परत फिरण्याचा विचारंच करवेना. काय करावं बरं? काहीही करून कडा पार करायचाच! आम्ही देखील इरेला पेटलो आणि सगळेजण खेड्याला फूस देऊ लागलो. हात-दोन हात अजून वर चढल्यावर मात्र त्याचे हात-पाय थरथरायला लागले. त्याला सावकाश खाली घेतलं. दगडावर शेवाळे उगवले होते… निम्मे-अधिक लोक चांगलेच दमले होते. कुल्ल्यातर रडकुंडीला आला होता. एकाच्याही मोबाईल ला रेंज नव्हती. जोम तितका राहिला नव्हता. तिथूनच डावीकडे ६-८ फुटांवर घळण दिसत होती. ती पार करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिथून मुख्य रस्त्याला मिळता येईना. त्यातही सुपीक डोक्यातून एक नामी शक्कल निघाली – की, असंच कड्याला डाव्या हाताला ठेवत पश्चिमेकडे चालत गेलो तर गडाला वळसा घालत कल्याण दरवाजातून आपल्याला गडावर प्रवेश करता येईल! (व्वा! व्वा! पोरगा युनिवर्सिटी टॉपर असणार यात शंकाच नाही!). मोर्चा वळवला. नेतृत्वाची सूत्रे आता मी ताब्यात घेतली. रस्ता तयार करत चाललो होतो. पावसाळ्यात माजलेल्या गवता-झुडपातून चालणं फार अवघड होतं. पंधरा एक मिनिटं झाली असतील तोच अजून एक घळण समोर आली आणि ती पार करणं अशक्यप्राय होतं. काय करावे कळेना. तीनही दिशांवर नाकेबंदी झाली होती. तिथेच बसावं म्हंटलं तर आम्हीच त्या उतरंडीवर कसेबसे उभे होतो. तसेच मागे वळालो. जिथून वळसा घालायला सुरुवात केली होती तिकडे निघालो. टॉवरच्या खाली परत आलो आणि खाली पाहिलं. अंगावर सरसरून काटा उभा राहिला… खाली जे काही (साधारण १० – १२ फुटांपर्यंत) दिसत होतं त्यातून आम्ही वर आलो यावर आमचा विश्वासच बसेना… क्षणभर मति गुंग झाली… नको तिथे दाखवलेलं फाजील धाडस अंगावर आलं होतं! आम्ही हरलो होतो! खाज जिरली होती! तिथेच बसलो. बसताना कोणी दगड किंवा नीटशी जागा शोधली नाही. तसेच गवतात-चिखलात जिथं बसावसं वाटेल तिथं बसलो. कारण आता त्या चिखलाचं काही वाटेनासं झालं होतं. कदाचित त्यानेही आम्हाला आपलंसं केलं असावं… डोकं थंड झाल्यावर फिरून सर्व शक्यतांवर विचार झाला आणि मग एक दिलाने मागे फिरण्याचा निर्णय पक्का झाला. जो रस्ता तयार करत चढलो त्यानेच उतरायचं ठरलं. बिकट वाटेने गड सर करायचं स्वप्नं हे स्वप्नंच राहिलं… खाली उतरणं खरंच अवघड होतं. हळू-हळू, एक-एक करत उतरायला सुरुवात केली. पण आल्यामार्गाने खाली उतरताना अजून एक अडचण समोर आली. तोच रस्ता परत वापरणं धोक्याचं होतं. कारण, तो फार निसरडा झाला होता, त्यात उतारही तीव्र होता. याही वेळी सोहम पुढे झाला. आम्ही त्यास कबूल झालो याला कारणं दोन, पहिलं म्हणजे तो अशा खडतर प्रसंगी जबाबदारी सांभाळू पहात होता आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे तो आहे बलदंड (ढोला नव्हे), चुकून सटकलाच तर पुढच्या सगळ्यांना घेऊन पायथ्याशीच भेटायचा! आता मात्रं कोणाचीच रिस्क घेण्याची मनःस्थिती (आणि परिस्थितीही) नव्हती. उतरताना तोल पुढे जातो त्यामुळे अजूनच सावधानता बाळगावी लागत होती. हात आणि पाय भरून आले होते. एकवेळ तर चढणं उतरण्यापेक्षा सोपं वाटू लागलं. मधेच एकदा मागे वळून पाहिलं तर कुल्ल्या अगदी बसलाच होता आणि अंदाज घेत, थोडा-थोडा खाली घसरत होता. म्हंटलं हे भारी आहे. मग सगळेच बसलो आणि हळू-हळू उतरू लागलो. उतरू काय, अगदी बुड टेकवून घसरत होतो आम्ही! घसरत-घसरतच मग ढगांतून बाहेर आलो, झुडपांचा पट्टा पार केला आणि ती पायवाट दिसली! अहो, मग काय विचारता… आरडत-ओरडत, घोषणा देत धावत सुटलो! आमचा आनंद आम्हालाच लखलाभ!! सिंहगड पावला!!! गड सर करता न आल्याची बोच कोणालाच नव्हती. पिठलं-भाकरी, भजी न खाल्याचं अजिबात दुःख नव्हतं. सर्वजण सुखरूप परत आल्याने समाधानी होतो. त्या दिवशी प्रत्येकाची जिरली होती. पायवाटेने पुन्हा मुख्य मार्गावर आलो. डबे उघडले. चार घास पोटात गेल्यावर जरा तरतरी आली. परत मुख्य रस्त्याने सिंहगड चढण्याचा विचार कोणाच्याही डोक्यात चुकूनही आला नाही. तडक पायथ्याचे हॉटेल गाठले. प्रत्येकी दोन प्लेट पोहे, दोन बिस्किटांचे पुडे, चहाचे दोन-तीन कप ढोसल्यावर मग अंगात हीव भरून घराकडे सुटलो. वाटेत खडकवासल्याला थांबलो आणि लक्षात आलं की, वाघ्याचा कॅमेरा कोणाकडेच नाहीये. नक्की तो सिंहगडावर कुठे तरी पडला होता. “पण झालेल्या प्रकारात सारे धडधाकट परत आले, आता त्या कॅमेऱ्याचं मोल काहीच नाही…” एकदम अनमोल वाक्य वाघ्याने बेधडक टाकलं. थोडावेळ थांबलो आणि घरी परतलो… माझा अवतार पाहिल्यावर आईने दारातंच -

आई : #@$!%&*($#%

मी : अगं, निदान घरात तरी घे मला…

(घरात घेतल्यावर)

आई : $%#@$*&$%#$

मी : फुटबॉल! आई जाम वैतागली होती. पण, खरं टेन्शन बाबांचं होतं. बरबटलेला मी, त्यात कपड्यांना लागलेला पानांचा रंग आणि फुटबॉल यांचं गणित बाबांच्या पचनी पडलं नव्हतं. त्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावरूनच ते कळालं. (अशा लोकांची सद्सद्विवेकबुद्धी अखंड जागृतावस्थेत असते. त्यामुळे त्यांच्या पासून काहीही लपवता येत नाही. My sincere sentiments with children facing the same problem. Dear friends, I can understand your difficulties) आता अजून काय स्पष्टीकरण द्यावं हे मला सुचेना. माझी अवघडलेली परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. चहाचा घोट घेत असताना त्यांचे डोळे चमकले. पेपरात डोके खुपसताना त्यांचा चेहरा मिस्कील झाल्यासारखा वाटला…