भंग झाला अभंग - १
March 23, 2011
अमुक वासरे, अमुक दिनी, अमुक वर्षी
अवतरला अवनीवरती, एक बालक तेजस्वी
नाव ठेविले काहीसे, त्याच्या जन्मदात्यांनी
आड - नाव लागले, आपसूकच त्यामागूनी
Homo sapiens sapiens, असे त्याची जात
सोडूनी ती, लाविली भलतीच या जगात
वर्ण आणि वर्गानुरूप, शिक्के तयारच होते
आमचे-ह्यांचे-त्यांचे, आता कळू लागले सारे
तरी देखील आनंदाने, या कोलाहलात सामावला
मिळवणारच काही तरी मग, जिद्द जाळू लागली त्याला
काही तरी म्हणजे काय? कधी न झाला साक्षात्कार
काट्यास बांधुनी पाय, फिरू लागला गरागर
मोह, गर्व, मत्सर संगती, नोकरीही मिळविली
सुख, शांती, समाधान ते हेच वाटू लागे त्या मनी
संपले तेज, हरपले ओज, कसे राहतील डबड्यात?
निवडली वाट, याने जाणारी तमात
पण मिळता उसंत क्षणाची, पडतसे त्याला कोडे
मी कोण? काय? कुठचा? आणि जाणार तरी कोठे?
असंख्य ’मीं‘ची पैदास, काय याचे प्रयोजन?
गहन असे प्रश्न पडता, भयभीत होत असे मन
बस्स! म्हंटला पुरे, झाली उठाठेव नसती
घेतली पाठी सॅक, गेला थेट हरिश्चंद्रगडावरती
चढ गडाचा तीव्र, दमला, चेहेरा लाल
पेटला आतूनच त्याला, काय जाळे लोहगोल?
घालूनी शिवचरणी दंडवत, आशीर्वादाची इच्छा मनी
गाठला कोंकण कडा दमात, बसला मांडी ठोकुनी
मिटले डोळे अपोआप, तरी द्रुश्ये दिसती अफाट
ना बाजूस कोणी, नाद कानी सतराशे साठ
भांबावला तो, कळेना काय होते
हीच गडबड ’मनी‘ची, त्याच्या लक्षात येते
चित्त स्थिर कराया, बराच अवधी लागला
होताच इतका डोक्यात, गोंधळ, कालवा माजला
ध्यान लागता, भय गेले, प्रश्न पडला legendary
लहान, परी गहन, ‘का?’ असा एकाक्षरी
उठे कळ काळजातून, कळकळीने तरीही
न मिळे उत्तर त्याला बुद्धी भ्रमिष्ट जाहली
डळमळले चित्त, अवघडले शरीर त्याचे
मिसरूड नुकतेच फुटलेले, तारुण्यातल्या उमेदीचे
इकडे सामान्यांची, वर्षे लोटली पाच
फिकीर ना त्याला मुळी, फक्त ज्ञानाची आस