<-- home

साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा

बागलाणची शान - साल्हेर!

मोहीम: पुणे - नाशिक (जुने सीबीएस) - ताहराबाद - वाघाम्बे - सालोटा - साल्हेर - साल्हेरवाडी - मुल्हेरगाव - मोरा - मुल्हेर - मग दमल्या पावली घरी.

सवंगडी: आदित्य देशपांडे, प्रियदर्शन कारंजकर, अभिजीत नाईक आणि मी.

23-24-25/12/2011

पहाटेच पोहोचलो नाशिकला. कडाक्याची थंडी! या थंडीने आम्हाला तिन्ही दिवस साथ दिली. झोप थोडी झाली होती. उरलेली ताहराबादपर्यंत पूर्ण केली. ताहराबादच्या एसटी स्टॅंडवर चौकशी केली, साल्हेरवाडीची गाडी अजून पाउण तासाने होती. आळोखेपिळोखे दिले. अंग सैल करत होतो.. आणि दोन सुळके आकाशात घुसलेले दिसले. आह्हा! मांगी - तुंगी!

“अरे, कापराची डबी विसरली आहे..” प्रियदर्शनने आठवण करून दिली. बाहेर पडलो. दोन डब्या घेतल्या कापराच्या. एव्हाना माझे हात सुन्न पडले होते. मग बाजूच्या टपरीवर गेलो. आठ चहा.. चहाचा वाफाळलेला ग्लास हातात धरताना किती बरं वाटलं म्हणून सांगू… रस्त्याकडेला शेकोट्या पेटल्या होत्या. जाऊन बसलो एका शेकोटीजवळ. थोड्यावेळाने उभा राहिलो. पुढून, मागून छान शेकून घेतलं.. आता गडावर कसं होणार हा विचार झटकून दिला. शेकोटीचा मालक, काय झालं माहित नाही, पण आमच्याकडे बघत निघून गेला..
“ए अद्या, ये पटकन.. बैस.”
निर्लज्जम् सदासुखी!

नऊ. वाघाम्बे. टेकडीचा टप्पा पार केला. एका झाडाखाली बसलो. पराठे, सोलापूरची दाण्यांची चटणी, सफरचंद, क्या बात!

वाघाम्बे कडून चढताना… सालोटा - साल्हेर

salher-mulher-1

बारा. खिंड. सालोटा करून मग साल्हेरला जाणार होतो. सॅक आणि मॅट एकाठिकाणी आडोशाला ठेवल्या. अभिजीत आणि प्रियदर्शन रस्ता बघतो म्हणून पुढे गेले. अगदी सालोट्याच्या पूर्वेकडे वळसा घालत गेले. त्यांना हाका मारून बोलवून घेतलं. एका ठिकाणी कडा घासून - पुसून सपाट केलेला दिसतो. तिथून पायऱ्या असाव्यात असं वाटलं. पण तिथे जाता येईना.. मागाहून कळलं की तिथूनच पायऱ्या चालू होतात.

सालोटा (खिंडीतून काढलेला फोटो)

salher-mulher-2

दोन वाजले. बराच वेळ वाया गेला होता. पाण्याची एकच बाटली राहिली. मग परत फिरलो. वाटेत लाकडं दिसली. त्यांची मोळी बांधून घेतली. भूक लागली होती पण हादडत बसलो नाही. थोडक्यात पोटपूजा आवरली आणि साल्हेर कडे सुटलो.

साल्हेर चढताना दिसणारा सालोटा

salher-mulher-3

एक विलक्षण गोष्ट - साल्हेरवर म्हणजे वर, गडावर एकही झाड नाही. चुलीसाठी जळण मिळण्याची बात सोडाच, पण साध्या शेकोटीला देखील चार काटक्या मिळणार नाहीत. स्वयंपाक जर चुलीवर करणार असाल तर खिंडीतच जळण गोळा करावे. साल्हेरवाडीकडून चढत असाल तर मधल्या टप्प्यापासूनच जळणाची सोय करावी. अगदी आठवणीने!

चार. साल्हेरची गलिच्छ गुहा. बाजूला रेणुका माता, समोर गंगासागर.

साडेचार. स्वच्छ गुहा. गुहेच्या कोपऱ्यात गाठ मारलेल्या पिशवीत कचरा. गुहेच्या मध्ये मॅटपसरून पाय मोळके करणारे आम्ही.

फसलेला बेत - काही अपरिहार्य कारणांमुळे करावी लागलेली सव्वा किलो तांदळाची खिचडी!

salher-mulher-4

ही खिचडी आम्हाला दोन दिवस पुरली!

रात्री प्रचंड थंडी. झोप तशी टप्प्या-टप्प्यातच झाली. त्यात उंदरांची भर. डोळा लागतो न लागतो तोच खुसफुस सुरु. अख्खी रात्र तशातच गेली. उजेड झाला तेंव्हा कुठे शांतता मिळाली, थोडी ऊब आली आणि सगळ्यांनीच मग ताणून दिली.

उठलो. मग थोडं इकडे-तिकडे, काहींचं बराच वेळ इकडे-तिकडे, मग चहा-पाणी-बिस्कीट वगैरे, तोपर्यंत नऊ-साडेनऊ झाले… तेंव्हा तडक सुटलो परशुरामाकडे. इथेही पायवाट चुकलो… पहिला चुकला तो चुकलाच पण बाकीचे तिघेही वर तोंड करून त्याच्या मागे गेले. तसेच पुढे गेल्यावर वाट संपली. मी तिथूनच वर चढायला सुरुवात केली. प्रियदर्शन आणि अभिजीत अजून पुढे गेले, रस्ताच नाही म्हणल्यावर तेही तसेच वर चढले. आदित्य मागे गेला. त्याला पायवाट मिळाली.

परशुराम मंदिर - साल्हेर

salher-mulher-5

असा प्रताप केल्यानंतर सगळे वर मंदिरापाशी भेटलो आणि टोमणे मारायचे विसरूनच गेलो. नयनरम्य, विहंगम, नेत्रसुखद, चित्ताकर्षक आणि बरंच काही असा देखावा.. पण ही विशेषणं नंतर सुचली. सारं जग नजरेच्या खाली. चौथी-पाचवीच्या मुलाकडे पाहावं तसा सालोटा. इतर डोंगर तर चिल्लर वाटत होते. मंदिराचा कळसच काय तो वर नजर करून पाहावा लागतो. मंदिराच्या कट्ट्यावर चढलो. पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलो. मंदिर पाठीमागे. सूर्याची उबदार किरणं. पूर्वेकडे लख्खं उजेड. माझ्या डावीकडे डोंगररांगांना खाली ठेवत क्षितिजाची स्पष्ट रेषा, रेषेखाली मातीचा तपकिरी रंग आणि रेषेपासून वर निळाई. उजवीकडे क्षितीजाखाली शुभ्रता आणि वर निळाई. आसमंत भरून उरलेली निळाई. ह्या निळाईने परिणाम केला. बसलो. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. काहीतरी गवसलं होतं. पण काय ते कळत नव्हतं. समुद्रसपाटीपासून 1567 मीटर. हळूहळू परिसराची घनता जाणवायला लागली. आजूबाजूचे डोंगर मोठे - मोठे होत गेले आणि मी एका अजस्त्र, महाकाय पर्वतावर उभा आहे असं वाटायला लागलं. स्वतःच्या शुद्रतेची जाणीव झाली. शांत होत गेलो. स्थिर. निःशब्द. वेळेचं, काळाचं काही बंधन नाही..

“अरे, गाढवांनो उठा आता.. एक वाजत आलाय!” इति प्रियदर्शन.

हा: हा: हा: … मग काय? धडाधड पळत गुहेत. मग कालची खिचडी. अंघोळीची गोळी. कपडे बदल. घासपूस, फासफूस. गुहा टकाटक. भांडी टकाटक. सॅक पाठीवर. गडी तयार, की

साल्हेरवाडीकडे कूच

salher-mulher-5.5

शैलकडा - उजवीकडे टोकावरचा ठिपका म्हणजे परशुराम  मंदिर

salher-mulher-6

सव्वाचार. साल्हेरमातेचं दर्शन घेतलं. तितक्यात एसटी चालू झाली. जोरात हाका मारल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

साल्हेरवाडीत पारापाशी पोहोचलो. समोरच्या किराणा दुकानात चौकशी केली. कळालं की, तीच शेवटची एसटी होती आणि आता वडाप मिळणं देखील अवघड आहे. बोंबला! त्या रात्री मुल्हेरच्या सोमेश्वर मंदिरात पोहोचणं अपेक्षित होतं. परशुराम मंदिराचा टाईमपास नडला. तासभर तिथेच पारापाशी थांबलो. काही वाहन मिळेना. बाजूला जाऊन चहा घेतला. तो किराणा दुकानदार आता चांगला मित्र झाला होता. त्याने बोर दाखवले - “घ्या हात-पाय धुवून, तुमची सोय करतो झेडपीच्या शाळेत.”

आम्ही अंघोळीच उरकल्या. तेवढ्यात सटाण्याकडून एक इनोव्हा आली. हाक मारून थांबवली. ते जवळच्याच गावात जाणार होते. काम उरकून परत येतो म्हणाले. म्हणलं आता हा काही परत येत नाही. पण थोडी आशा होती. झेडपीच्या शाळेला कुलूप होतं आणि त्याच्या किल्ली वरून गोंधळ सुरु झाला. ज्याच्याकडे किल्ली असते तो गावातंच नव्हता. त्याचा मोबाईल नंबर कोणाकडे नव्हता आणि ज्याच्याकडे असेल असा अंदाज होता तो ह्यांना सापडत नव्हता.

आठ वाजले. तरी इनोव्हा आली नाही. जी थोडी आशा शिल्लक होती ती देखील सोडून दिली. दुकानाच्या सोप्यात झोपायचं ठरलं. पारावरंच बसलो होतो - उरलेलं सामान, दिवस याचं गणित जमवत होतो. हॉर्न वाजला. टिपिकल टोयोटा. अभिजीतचे डोळे चमकले. इनोव्हाच होती ती! पारापाशी येऊन थांबली. त्यांनी आमची श्टोरी ऐकून घेतली. पुण्याहून निघालो - साल्हेरवर वेळ गेला - उशीर झाला - मुल्हेरला जायचंय - वगैरे… गडी उतरला.
“फार अंधार झालाय आता, असं सोडता यायचं नाही तुम्हाला…“
खादीचा कडक शर्ट, पांढरी पॅंट. साहेब त्या भागातून झेडपीच्या इलेक्शनला उभे राहिले होते. तो दुकानदार, इतर गावकरी त्यांच्याशी अदबीने बोलत होते. साहेबांचं वजन असावं त्या भागात. लगोलग मोबाईल लावला.
“हॅलो, कोण शिंदे मास्तर का?”
“पुण्यावरून आपली पोरं आली आहेत. त्यांची जरा राहायची, जेवायची सोय करा, काय?”
“हा ठीक.”
धन्यवाद, शेक हँड झाले. आमची सोय साल्हेरवाडीच्या आश्रमशाळेत झाली होती.

पारापासून आश्रमशाळा चालत तीन मिनिटांवर. तिथे पोहोचलो. अगबाब्बो!!! शाळेचं ऑफिस रिकामं करण्यात आलं होतं. मधे चार गाद्या, त्यावर कॉटनचं बेडशीट, उश्या, चादर आणि हे सगळं करकरीत नवीन! आमच्यासाठी त्या ऑफिसमध्ये बल्ब बसवण्याचं काम चालू होतं. शिंदे मास्तरांकडे टॉर्च होता. पाच-सहा विद्यार्थ्यांनी बाहेरून वायर ओढून, सॉकेट नसताना सुतळीने बल्ब बांधून एकदाचा तो चालू केला. भारावलो. थोडे ओशाळलो. जेवण झालंय म्हणून सांगितलं. सॅक आत ठेवल्या. पातेलं बाहेर काढलं. चहा घेतला होता तिथे गेलो. खिचडीला फोडणी दिली, छान गरम केली, आणि एकदाची संपवली.

आश्रमशाळेत परत आलो. शिंदे सर आणि तिथल्या विद्यार्थांशी गप्पा मारल्या. उत्साही, होतकरू मुलं. सरकारची अनास्था. काही चांगल्या सोयी. खेळाकडे होणारं दुर्लक्ष वगैरे… पण ते काही मदत घेईनात. प्रियदर्शनने त्याचा एक चांगला टी-शर्ट तिथल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन मधे भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला भेट दिला. दुसऱ्या दिवशी तो पठ्ठ्या पहाटे चार वाजता तोच शर्ट घालून प्रॅक्टिस करत होता!

हे तिघे मग पत्ते खेळत बसले. मी पुस्तकांच्या कपाटापाशी गेलो. भर शैक्षणिक पुस्तकांवर होता. तरी तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी, मार्क्सवाद, समाजवाद - अशी अवांतर पुस्तकं पण होती. दोन-तीन कप्पे उघडे होते. त्यातलं दलित चळवळीवरचं एक पुस्तक वाचलं.

सकाळी 6 ची एसटी होती आणि आम्ही ती चुकवणार नव्हतो. साडेपाचलाच उठलो. आवरलं. शिंदे मास्तर अजून झोपले होते. मुलं व्यायाम करत होती. त्यांच्याकडे निरोप देऊन निघालो. झकास सोय झाली होती. झोप पण मस्त झाली. पारापाशी आलो. काय सुंदर नजारा!

साल्हेरवाडीचा पार, सकाळी 06:03 - अप्रतिम!

salher-mulher-7

एसटी आली. तीने आम्हाला मुल्हेर गावात सोडलं. मग चहा, बिस्कीट, वेफर्स. दिवसाची सुरुवात अगदी मस्त झाली होती.

मुल्हेरला जाताना

salher-mulher-8

salher-mulher-9

कमाल!

salher-mulher-10

V for Vendetta

salher-mulher-11

मोरा - तिसरा दरवाजा

salher-mulher-12

मुल्हेरचे गणेश मंदिर

salher-mulher-13

मुल्हेरवरचा तांबडा ठिपका - जय हनुमान! (चांगला पुरुष-सव्वा पुरुष उंचीचा आहे)

salher-mulher-14

दहा. सोमेश्वर मंदिर. फार सुंदर आहे. इथे आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय होते. तसेच आधी सांगितलंत तर जेवण सुद्धा बनवून देतात. मंदिरातूनच आतमध्ये दोन जिने खाली उतरलात की पिंड आहे महादेवाची. अंधार. समईचा छान उजेड. शांत. इथे ओंकार म्हणालो. प्रसन्न वाटलं.

सॅक मंदिरात ठेवल्या. विशेष भूक नव्हती तरी थोडं-थोडं खाऊन घेतलं आणि मोराकडे मोर्चा वळवला. मोराला उजवीकडे ठेवत वळसा घालू लागलो. पण लक्षात आलं की परत एकदा पायवाट चुकली आहे. मग परत फिरलो. वाट सापडली. मग सरळ मोरा.

मोरागडावरील अतिफेमस गाणं - “मोरा” पिया मोसे बोलत नाही…

salher-mulher-15

मोरा - तिसरा दरवाजा, डावीकडे मुल्हेरचे पठार

salher-mulher-16

मोरावर पाहण्यासारखे विशेष काही नाही. पूर्वेकडे एक-दोन टाकी आहेत.. पाणी पिण्यालायक नाही.
मोरा आणि मुल्हेर एका भिंतीने जोडले आहेत. भिंतीची रुंदी सणसणीत आहे. मुल्हेरच्या दरवाजातच दरड कोसळली आहे.. अगदी अवघड नाही. थोडी कसरत करून मुल्हेर वर जाता येते.

भडंगनाथ मंदिर - मुल्हेर

salher-mulher-17

पठारावर उरलेले दरवाजाचे अवशेष - मुल्हेर

salher-mulher-18

मोरा - मुल्हेर , त्यांना जोडणारी भिंत पण दिसत आहे.

salher-mulher-19

मुल्हेर उतरताना चांगलीच भूक लागली. हत्ती टाके पाहून सोमेश्वर मंदिरात परत आलो. मेरीवाली - तेरीवाली - सबकीवाली मॅगी वरपली. थोडं फरसाण, भडंग, त्यात कांदा चिरून टाकला, लिंबू पिळलं. भरपेट मुल्हेर उतरू लागलो.

सोमेश्वर मंदिर , मागे मोरा

salher-mulher-20

तिथून ताहराबादपर्यंत टेम्पोने आलो. एसटीतून नाशिक. पुण्याला येणाऱ्या सगळ्या गाड्या हाउसफूल! शेवटी जादाची सोडलेली शिवनेरी मिळाली. थंडगार एसीतून घरी.

फोटोग्राफर - आदित्य देशपांडे
कॅमेरा - Fujifilm FinePix HS20EXR

photographer

दुसऱ्या दिवशी अभिजीतने त्याच्या कंपनीत एक मेल सर्क्युलेट केला -
I am sharing link of pics of my trek to Salher-Mulher. Through out the trek I was reminded a song by Kusumagraj “Mahrashtra Desha, kankhar desha dagadanchya desha….” Extreme weather (very hot in day and very cold in night), sleepless night partially due to rats, we worked hard to create enough fire for a night and all this was forgotten at “Parshuram mandir”. It was indeed my pleasure to call it “Kanyakumari of land” as we could see 3 different colors of sky.Mulher was comparatively easy but equally fascinating.

To sum up I would say the trek (almost true for every trek that I have done) was like cultured marathi girl. It is very difficult to woo a marathi girl similarly you have to work hard (highest fort in maharashtra) to get to natural beauty that these forts have. As you move closer and closer you get to know that there is nothing more beautiful than this you can get in your life. Girls here are not only famous for there innate beauty but they know how to use weapons if anybody misbehaves with them. Similarly forts here can turn hostile if anybody tries go beyond the limits and try to do something else. It is never forgetting experience that you cherish all your life be it girl or fort.

I know its not gods own country or its not very rangeela but you will agree with me once you be there it induces feeling “kaise rahega bhala hoke tu mujhse judaa”

Yours Abhijeet